Search This Blog

Tuesday, 27 August 2019

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लढताना जद(यू)ला ‘बाण’ या पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या वापराला मनाई

  • महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक लढताना जद(यू)ला ‘बाण’ या पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा वापर करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. महाराष्ट्रात धनुष्यबाण हे शिवसेनेचे तर झारखंडमध्ये झारखंडमुक्ती मोर्चाचे निवडणूक चिन्ह असून ‘बाण’ चिन्ह त्याच्याशी साधर्म्य असलेले आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले.
  • यापूर्वी निवडणूक आयोगाने जद(यू)ला दोन राज्यांमध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह वापरण्याची सवलत दिली होती. मात्र चिन्हांमध्ये साधर्म्य असल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते, असा मुद्दा झारखंड मुक्ती मोर्चाने उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ही सवलत मागे घेतली आहे.
  • शिवसेना, जद(यू) आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे अनुक्रमे महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड राज्यांमधील राज्य पक्ष आहेत.
  • सर्व बाबींचा सारासार विचार केल्यानंतर यापुढे जद(यू)ला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये ‘बाण’ या निवडणूक चिन्हाचा वापर करता येणार नाही, असा आदेश निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी जारी केला.
  • झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेला बिहारमध्ये आपल्या निवडणूक चिन्हाचा वापर करता येणार नाही, असा आदेश निवडणूक आयोगाने मार्च महिन्यात दिला होता. जद(यू)ने या बाबत आयोगाकडे जानेवारी महिन्यात दाद मागितली होती.
  • दरम्यान, निवडणूक आयोग (ईसी) जे चिन्ह देईल त्या चिन्हावर झारखंड विधानसभेची आगामी निवडणूक जद(यू) लढवेल, असे जद(यू)ने सोमवारी स्पष्ट केले. मात्र झारखंड मुक्ती मोर्चाला (जेएमएम) देण्यात आलेले ‘धनुष्य बाण’ चिन्ह आदिवासी संस्कृतीशी संबंधित असल्याने ते गोठवावे यासाठी निवडणूक आयोग आणि झारखंड उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा निर्धार जद(यू)ने व्यक्त केला आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी