Search This Blog

Wednesday, 25 April 2018

शब्दांचीच ‘रत्ने’ : मायमराठीची माय

मराठीचं मूळ कोणत्या भाषेत किंवा मराठीची जननी कोण असे प्रश्न काही ‘शंकासुर’ लोकांना अधूनमधून पडतात. त्यांची भरपूर चर्चा होते. असं म्हणतात की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ कधी शोधू नये. माझ्या मते त्या यादीत भाषेचाही अंतर्भाव करायला हवा. कारण भाषेचं मूळ शोधणं अत्यंत अवघड कसलं, अशक्य आहे. शोधणार कसं? हजार दोन हजार वर्षांपूर्वीचे काही लेखी पुरावे कुठे कुठे सापडू शकतात. पण त्याआधीही भाषा होतीच की! आता मराठीचंच उदाहरण घेऊ. ‘श्री चावुंडराये करवियले. श्री गंगाराये सुत्ताले करवियले’ हा मराठीमधला आद्य शिलालेख. तो साधारण हजार वर्ष जुना आहे.

पण हा शिलालेख हजार वर्षांपूर्वीचा असला तरी हे काही मराठीमधलं पहिलं वाक्य नव्हे. मराठी त्यापूर्वी कित्येक र्वष वापरात असणार. मग आता ती नेमकी कधी जन्मली आणि तेदेखील कोणत्या भाषेच्या पोटी हे कसं सांगता येईल? भाषेला काही जन्मदाखला नसतो की अमुक तारखेला अमुक वाजता अमुक मातेच्या पोटी जन्म झाला!

आता विषय निघालाच आहे तर या शिलालेखासंदर्भातल्या दोन गोष्टी सांगतो. हा शिलालेख श्रवणबेळगोळ या गावी आहे. श्रवणबेळगोळ हे जैन धर्मीयांच्या अतिशय महत्त्वाच्या तीर्थस्थानांपैकी एक. तिथे ‘गोमटेश्वर बाहुबली’चा सुमारे ६० फूट उंचीचा भव्य पुतळा आहे. एकाच दगडातून कोरून काढलेला हा जगातला सर्वात मोठा पुतळा. त्याच्या डाव्या पायालगत तो शिलालेख आहे अगदी नजरेत भरेल अशा ठिकाणी. श्रवणबेळगोळ येतं दक्षिण कर्नाटकात! मराठी बोलल्या जाणाऱ्या भूभागापासून कमीतकमी ५००-६०० कि.मी. अंतरावर! त्या चावुंडरायाने नेमक्या कोणत्या प्रेरणेने तो शिलालेख कोरून घेतला कोणास ठाऊक!

पण भाषेला जननी नसते तर भाषा निर्माण तरी कशी होते? एवढी प्रगत, एवढी गुंतागुंतीची भाषा काय अचानक आभाळातून पडते काय? याचं उत्तर असं आहे की भाषा उत्क्रांत होत असते. पृथ्वीवरची एवढी प्रगत जीवसृष्टी जशी त्या आदिम एकपेशीय अमीबापासून उत्क्रांत होत तयार झाली तशी.

उत्क्रांती ही तशी खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण एखादी गोष्ट उत्क्रांत होते म्हणजे नेमकं काय होतं, उत्क्रांतीच्या खुणा कोणत्या ते चटकन पाहता येईल. उत्क्रांत होण्याचा एक भाग म्हणजे परिपक्वता. बघा ना, साध्या सोप्या अमीबापासून सुरुवात करून किती प्रगल्भ जीवांपर्यंत येऊन ठेपली आहे पृथ्वीवरची जीवसृष्टी. उत्क्रांत होण्याचा दुसरा भाग म्हणजे छोटे छोटे बदल. बदल सतत घडत असतात. पण ते खूप लहानलहान असतात. कधीकधी तर चटकन लक्षात येणार नाहीत इतके सूक्ष्म. पण ते घडत राहतात आणि मुख्य म्हणजे साठत राहतात. असं थेंबे थेंबे तळं साचतं आणि लहान बदलांचा एखादा मोठा बदल बनतो. उत्क्रांतीमध्ये मोठे बदल घडलेले दिसतात, पण प्रत्येक मोठा बदल हा असा लहान लहान बदलांचाच बनलेला असतो. अचानकपणे कोणताच मोठा बदल घडत नाही. असा अचानक मोठा बदल घडला तर ती क्रांती, उत्क्रांती नव्हे. निसर्गातदेखील क्रांती होते. पण असे प्रसंग दुर्मीळ. उत्क्रांतीचा तिसरा भाग म्हणजे शाखा उपशाखा तयार होणे. म्हणजे त्या आद्य अमीबापासून बारकेबारके बदल होत होत मानव उत्क्रांत झाला हे खरं पण म्हणून जगात अमीबा शिल्लकच नाही राहिले असं नाही. आजही जीवसृष्टीमध्ये अगदी आदिम एकपेशीय सजीवही आहेतच की!

भाषेचंही तसंच आहे. अनादिकाली कधी तरी कुठल्या तरी घनदाट जंगलात कोणत्या तरी आदिमानवाने दुसऱ्या एखाद्या आदिमानवाला आवाज करून काहीतरी सांगितलं तेव्हा भाषा निर्माण झाली. आणि तिथून पुढे ती उत्क्रांत होत गेली. म्हणजे ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. तिच्यात अधिक अर्थपूर्ण शब्दांची भर पडत गेली. तिच्यात लहान लहान बदल होत गेले आणि ते साचून त्यांचे मोठे बदल बनले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या शाखा-उपशाखा होत राहिल्या. त्यांच्यात परत आपापसात देवाणघेवाण होत राहिली.

हा गुंता वरवर पाहता जितका सोपा वाटतो त्यापेक्षा कितीतरी अधिक किचकट असतो. म्हणजे भाषा कैक शब्दांच्या बनलेल्या असतात. त्यात कित्येक शब्द त्या हवे तसे वाकवतात, वळवतात, सोयीचे करून घेतात. आता हा गुंता सोडवायचा कसा? या सगळ्या जंजाळातून अमुक भाषेची जननी कोण हे कसं सांगता येणार?

त्यामुळे कोणत्याही भाषेची जननी कोण हे सांगता येणं कठीण. पण एखाद्या भाषेवर प्रभाव कोणकोणत्या भाषांचे आहेत हे मात्र नक्कीच सांगता येतं. कोणत्याही दोन भाषा परस्परांच्या संपर्कात आल्या की त्यांचा परस्परांवर कमीअधिक प्रमाणात का होईना प्रभाव पडतो. जगभर हे होत असतं. इंग्रजीचं उदाहरण घेऊ. त्या भाषेवर फ्रेंच, जर्मन अशा अनेक युरोपीय भाषांचा प्रभाव तर आहेच, पण हिंदी, मराठीमधूनदेखील काही शब्द इंग्रजीत गेले आहेत.

मराठीवरदेखील अनेक भाषांचा प्रभाव पडलेला आहे आणि मला खात्री आहे की मराठीचादेखील त्या भाषांवर प्रभाव पडला असणार. भौगोलिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध कारणांनी विविध भाषा बोलणारे लोक मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या संपर्कात आले आणि साहजिकच मग त्या भाषांचा मराठीवर प्रभाव पडला. आता कोणत्या त्या भाषा आणि काय तो प्रभाव एवढंच काय ते बघायचं शिल्लक राहिलं. ते अर्थातच पुढल्या भागात.
सौजन्य – लोकप्रभा
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी