Search This Blog

Tuesday, 24 April 2018

प्रवाशांसाठी अच्छे दिन ! रेल्वे स्थानकं होणार विमानतळांसारखी चकाचक, २०१९ पर्यंत रुपडं पालटणार

भारतीय रेल्वे प्रवाशांना लवकरच दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची अगदी विमानतळांसारखी चकाचक रेल्वे स्थानकं मिळणार आहेत. मध्य प्रदेशातील हबीबगंज आणि गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानकांचं काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून महिन्याच्या सुरुवातीला लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेसेववर अनेकदा वेळखाऊ प्रोजेक्ट असल्या कारणाने टीका होत असते त्यामुळेच लवकरात लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (IRSDC) IRCON आणि RLDA यांच्या साथीने या स्थानकांची जबाबदारी घेतली आहे. रेल्वे मंत्रालय या प्रोजेक्टसाठी जबाबदार असणार आहे.

आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस के लोहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचं काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल. तर गांधीनगर स्थानकाचं काम ९ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल. प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात हाच या प्रोजेक्टचा मुख्य उद्धेश असल्याचंही ते बोलले आहेत.

या स्थानकांची देखभाल आणि महसूल निर्मितीची जबाबदारी आयआरएसडीसीकडे असणार आहे. ‘या स्थानकांमधून जास्तीत जास्त महसूल मिळावा यासाठी खात्री करणं गरजेचं आहे. तसंच मिळणारा महसूल हा त्याच स्थानकांच्या देखभाल आणि विकासासाठी वापरला जाईल’, अशी माहिती लोहिया यांनी दिली आहे. ‘जरी आम्ही स्थानकांचा विकास केला तरी देखभाल खर्च सध्या कमी आहे. एकदा हबीबगंज स्थानक पूर्णपणे तयार झाल्यानंतर हा खर्च जवळपास चार ते पाच कोटी असेल. सोबतच मिळणारा महसूला हा वर्षाला किमान ६.५ ते सात कोटी असेल असा अंदाज आहे. हा महसून १० कोटींपर्यत जावा यासाठी आमचा प्रयत्न आहे’, असंही लोहिया यांनी सांगितलं आहे.

पीपीपी (Public-Private Partnership) अंतर्गत पुनर्विकसित केलं जाणार हबीबगंज पहिलं रेल्वे स्थानक असणार आहे. यासाठी जवळपास ४५० कोटींचा खर्च येणार आहे. यामधील १०० कोटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासावर तर ३५० कोटी व्यवसायिक विकासाकरिता वापरण्यात येणार आहेत.

हबीबगंज रेल्वे स्थानकाला अगदी विमानतळासारखा लूक देण्यात येणार आहे. ‘रेल्वे स्थानकावर अतिरिक्त वेटिंग बेंच, स्वच्छ शौचालय, दुकानं याशिवाय व्हिडीओ गेम झोन्स आणि व्हर्च्यूअल म्युझिअम असणार आहेत’, असं लोहिया यांनी सांगितलं आहे. रेल्वे स्थानकाला पूर्ण एलईडी लायटिंग केलेली असणार आहेत. याशिवाय सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सोय असणार आहे. याशिवाय बाईक शेअरिंग टर्मिनल्स असणार आहेत. भविष्यात इलेक्ट्रिक पिक अप वाहन, त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशन असतील. तसंच फूड प्लाझा आणि कॅफेटेरिया असणार आहेत.

गांधीनगर रेल्वे स्थानकाची वीट जानेवारी २०१७ मध्ये ठेवण्यात आली होती. दोन वर्षात स्थानकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. लोहिया यांनी सांगितल्याप्रमाणे ४२ टक्के बांधकामाचं काम पूर्ण झालं आहे. व्हायब्रंट गुजरात परिषद पार पडणार असल्या कारणाने कोणत्याही परिस्थितीत २०१९ पर्यंत काम पूर्ण करावं लागणार आहे. सध्या कामगार २४ तास काम करत आहेत. विशेष म्हणजे स्थानकावर एक फाईव्ह स्टार हॉटेलदेखील असणार आहे. प्रवाशांसाठी ट्रान्झिस्ट हॉलमध्ये ६०० असणार आहेत. तिथे बूक स्टॉल, शॉप, फूड स्टॉल आणि स्वच्छ स्वच्छतागृहे असणार आहेत.

रेल्वेने विकसित करण्यासाठी ७९४ रेल्वे स्थानकांची निवड केली आहे. त्यांच्यासाठी टेंडर काढण्यात येणार आहेत. सध्या हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वे स्थानकांचं काम सुरु असलं तरी सूरत, ग्वालिअरसारख्या काही स्थानकांचं डिझाइन तयार आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी