Search This Blog

Wednesday, 25 April 2018

आठ सुवर्णपदकांच्या पडद्याआडचा बादशहा...

ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचा पाऊसच पाडला. त्यातही बॉक्‍सिंगमध्ये तब्बल आठ सुवर्णपदकांची कमाई केली. सुवर्णपदक मिळवलेले खेळाडू जरूर हिरो ठरले. परंतु, बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदके मिळवून देणाऱ्या भारतीय खेळाडूंचे प्रशिक्षक जयसिंग ज्ञानू पाटील पडद्याआडच राहिले.
कोल्हापूरपासून १५-१६ किलोमीटर अंतरावर असलेल्या खाटांगळे (ता. करवीर) या छोट्या गावचे जयसिंग पाटील भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, हे कोल्हापूरकरांना स्पर्धा संपल्यानंतर आणि भारतीय संघ स्पर्धेहून परत आल्यानंतरच कळाले. ठराविक खेळांचा उदो उदो करणारे आपण इतर खेळातील खेळाडूंच्या कामगिरीकडे कसे दुर्लक्ष करतो, हेच या निमित्ताने दिसून आले. मात्र, जयसिंग पाटील यांनी साऱ्या बॉक्‍सिंग विश्‍वाचे लक्ष या कामगिरीनंतर त्यांच्याकडे खेचून घेतले. 
उशिरा कर्तृत्वाची दखल
आयपीएलमध्ये मश्‍गुल असलेल्या सर्वांनी खूप उशिरा जयसिंग पाटील यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली. अर्थात यामुळे जयसिंग पाटील यांचा उत्साह जरा देखील कमी झालेला नाही. क्रिकेट सोडून इतर सर्व खेळांतील खेळाडूंच्या वाट्याला अशी परिस्थिती येते; परंतु त्याकडे लक्ष द्यायचे नसते. उलट अधिक जोमाने पुढच्या स्पर्धेकडे लक्ष द्यायचे असते आणि तेच घडते आहे. आगामी ऑलिंपिकच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची पुढची तयारी सुरू आहे.

कुडित्रे, सांगरूळजवळ खाटांगळे हे छोटे गाव आहे. या गावातील अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातले जयसिंग पाटील खेळाच्या आवडीमुळे वयाच्या दहाव्या वर्षीच स्पोर्टस्‌ बॉईज खडकी येथे दाखल झाले. तेथे शिक्षणाबरोबरच विविध खेळांत ते आपले वेगळेपण दाखवत राहिले. परंतु, मुळातच रांगडेपणा शरीरात भरलेले जयसिंग पाटील बॉक्‍सिंग या रांगड्या खेळाकडे अधिक आकर्षित झाले. वयाच्या १७ व्या वर्षी खेळाच्या या जोरावर ते भारतीय सेना दलात शिपाई म्हणून भरती झाले.

तेथे त्यांच्यातील खेळाला व्यापक रिंग मिळत गेले व भारतीय सेना दलातील एक चांगला बॉक्‍सर म्हणून क्रीडा विश्‍वात चमकू लागले. सुभेदार पदावर ते पोहोचले; पण प्रसंग असा घडला आठ सुवर्णपदकांच्या पडद्याआडचा बादशहा...की, एका स्पर्धेच्या दरम्यान प्रतिस्पर्ध्याचा ठोसा त्यांच्या डोळ्यावर बसला आणि डोळ्यातला पडदा फाटला. एका डोळ्याची दृष्टी जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, त्यांच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. खेळावर मात्र मर्यादा आल्या. 

या परिस्थितीत जयसिंग पाटील खचले नाहीत. ते प्रशिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी ‘एनआयएस’ पतियाळात सेना दलामार्फत दाखल झाले व बॉक्‍सिंगचे प्रशिक्षक बनले. आज ते केवळ सेनादलातील बॉक्‍सरचे नव्हे, तर भारतीय बॉक्‍सर संघाचे प्रशिक्षक आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आठ सुवर्णपदके त्यांनी खेचून आणली. हे झाले जयसिंग पाटील यांचे कर्तृत्व; पण एवढ्या मोठ्या कर्तृत्वाची कोल्हापूरकरांनी फार कमी दखल घेतली. किंबहुना, खाटांगळेसारख्या छोट्या गावातला कोणीतरी जयसिंग पाटील चक्‍क भारतीय बॉक्‍सिंग संघाचा प्रशिक्षक असू शकतो, हेच अनेकांच्या ध्यानात आले नाही. त्यामुळे आठ सुवर्णपदकांची कमाई करूनही जाहीर कौतुकाची संधी त्यांना कोल्हापुरातून फार कमी लाभली.
[संदर्भ : सकाळ ]
अधिक Study Material साठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा » t.me/spardhavahini

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी