Search This Blog

Monday, 9 April 2018

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गुगलचे अभिवादनभारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या १५३व्या जन्मदिनानिमित्त गुगलने त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. नाकात नथ आणि पारंपारिक साडी परिधान केलेल्या वेशात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे डिग्री प्रमाणपत्र दाखवतानाचे त्यांचे रेखाचित्र साकारुन डुडलद्वारे गुगलने त्यांना अभिवादन केले आहे. बंगळूरुस्थित रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी हे चित्र साकारले आहे.

यानिमित्त गुगलने लिहीलेल्या आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, १८८६मध्ये एक तरुण महिला डॉक्टर अमेरिकेहून भारतात परतली. त्यानंतर कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात तिने महिलांच्या वॉर्डसाठी फिजिशिअन म्हणून कार्यभार स्विकारला. भारतातील केवळ पहिली महिला डॉक्टरच नव्हे तर सर्वात कमी वयात अर्थात अवघ्या १९व्या वर्षात वैद्यकीय पदवी घेतलेली ही पहिली महिला डॉक्टर होती. तिचे नाव होते आनंदी गोपाळ जोशी. त्या धाडस आणि चिकाटीचे प्रतिक होत्या.

जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यातील एका सधन कुटुंबात झाला होता. त्यानंतर वयाच्या ९व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पतीने त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची डिग्री मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालायतून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या.

मात्र, दुर्देवाने आनंदीबाईंना खूपच कमी जीवन लाभले. वयाचे २२वे वर्ष पूर्ण होण्याआधीच क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. असे असले तरी त्यांच्या कार्याने पुढील अनेक पिढ्यांमधील महिलांना प्रोत्साहन दिले. दरम्यान, शुक्र ग्रहावरील एका विवराला आनंदीबाईंचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी