Search This Blog

Wednesday, 21 March 2018

शिक्षणाची पुढची इयत्ता

देशातील साठ शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याचा केंद्रीय मनुष्यबळ खात्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या स्वायत्तता मिळालेल्या संस्थांमध्ये जशी काही विद्यापीठे आहेत, तशी काही महाविद्यालयेही आहेत. यापूर्वीही काही विद्यापीठांना अशी स्वायत्तता देण्यात आली आहे. अडीच दशकांपूर्वी भारतात सुरू झालेली उदारीकरणाची प्रक्रिया शिक्षणात येण्यास तसा विलंबच झाला आहे.
त्यामुळे, 'सब घोडे बारा टक्के' या न्यायाने सर्व महाविद्यालये आणि सर्व विद्यापीठांमध्ये एकाच प्रकारचा अभ्यासक्रम चालवून दरवर्षी छापाचे गणपती तयार करणाऱ्या कारखान्यांप्रमाणे शिक्षणसंस्थांची अवस्था झाली होती. त्यात सर्जनाला, नवविचाराला, प्रयोगांना आणि कल्पकतेला काहीही स्थान उरले नव्हते. असे स्थान न उरल्याने देशतील साऱ्या शिक्षणक्षेत्राला शैथिल्याने आणि मरगळीने ग्रासले होते. आजही ही मरगळ पुरती दूर झालेली नाही. मात्र, ती दूर करण्याचा स्वायत्तता हा एक मार्ग जरूर आहे. या शैक्षणिक स्वातंत्र्यामुळे या शिक्षणसंस्थांना आपापले अभ्यासक्रम ठरविण्याचा आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना पदविका अथवा पदवी देण्याचा अधिकार मिळणार आहे.
राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि मानांकन परिषदेने (नॅक) जी मानांकने केली, त्यांचा आधार विद्यापीठ अनुदान आयोगाने तसेच मनुष्यबळ खात्याने घेतला आहे. या मानांकनात 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'ने जे अग्रस्थान मिळवले, ते गौरवास्पद आहे. यामुळेच पुणे विद्यापीठाला पहिल्या श्रेणीचे स्वायत्तता गुणांकन मिळाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्ञानाचा जो प्रचंड विस्फोट होतो आहे, त्याच्याशी ताळमेळ राखण्यात अपवाद वगळता भारतीय शिक्षणसंस्था साफ अपयशी ठरल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत तर ज्ञान आणि ज्ञानप्रक्रियेकडे अत्यंत संकुचित, पठडीबाज आणि उथळ दृष्टीने पाहण्याची जणू रीतच पडली आहे. अशावेळी, ज्ञान देणाऱ्या संस्था चैतन्यदायी बनवायच्या असतील तर त्यांना स्वातंत्र्य देण्याची नितांत गरज होती. या निर्णयाने ती पुरी झाली आहे. या साऱ्याच संस्थांनी आता नवे दूरस्थ तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम वेगाने सुरू करायला हवेत. विषयांच्या तटबंद्याही मोडायला हव्यात. एकेकाळी भारत आणि चीन यांची शिक्षणातील वाटचाल समांतर होती. आज अशी तुलना करणे वेडेपणाचे ठरेल, इतकी झेप चीनने घेतली आहे. तसे भारतात होण्यासाठी याहूनही वेगाने शिक्षणात नवे वारे यायला हवेत.
[Source: Maharashtra Times / Mar 22, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी