
ज्येष्ठ साहित्यिक, अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. केंद्र सरकारने पद्मश्री या पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. ते ८१ वर्षांचे होते.
दलित साहित्य आणि दलित चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या पानतावणे यांनी लोकसाहित्य, कविता, नाटक, समीक्षा आणि संशोधनपर लेखन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दलित साहित्य अकादमी, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २००९ मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉ. पानतावणे यांच्याकडे स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद होता व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच जाणीवही होती. पानतावणे यांचे वाचनही चौफेर होते. धर्म-जाती-देश-निरपेक्ष अशा ‘साहित्यिक’ या भूमिकेवरच ते प्रेम करत आल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. केंद्र सरकारने नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
पानतावणे यांचे धम्मचर्चा, मूल्यवेध, मूकनायनक, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दुसऱ्या पिढीचे मनोगत, लेणी आदी साहित्य प्रकाशित झाले होते.
[Source: Loksatta | March 27, 2018]
0 comments:
Post a comment
आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी