Search This Blog

Thursday, 22 March 2018

अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा स्थगित ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा रद्द करा, या मागणीसाठी विधानसभेत झालेले रणकंदन पाहून अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

उच्च न्यायालयात सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेमधे अंगणवाडी सेविका संपकाळात बाल मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणुन दिले होते. उच्च न्यायालयानेच त्यांना मेस्मा अंतर्गत कारवाई का करत नाही याची विचारणा केली होती. जुना कायदा लेप्स झाल्याने राज्य सरकारने नव्या मेस्मा कायदा लागु केला होता.

विधानसभा सदस्यांची भावना लक्षात घेऊन अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. बुधवारी या प्रकरणी शिवसेना सभागृहात आक्रमक झाले होते. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल सातवेळा तहकूब करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या मदतीला कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सदस्यही मदतीला आले होते. शिवसेनेसह विरोधकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या. शिवसेना आमदार न्यानराज चौगुले यांनी राजदंड पळविल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना गेली अनेक वर्षे पाच हजार रुपये व मदतनीसांना साडेतीन हजार रुपये मानधन देण्यात येत होते. गेल्या वर्षी दोन लाख अंगणवाडी सेविकांनी २६ दिवस संप पुकारल्यानंतर सरकारने त्यांच्या मानधनात १५०० रुपये वाढ केली . त्याचप्रमाणे १ एप्रिल २०१८ पासून पाच टक्के मानधनवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. तथापि पाच टक्केवाढीचा आदेश अद्यापपर्यंत काढण्यात आला नसून सरकारने अंगणवाडय़ांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाडय़ा असून या अंगणवाडय़ांमधून दोन लाख अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील ७३ लाख बालकांना पोषण आहार दिला जातो. या दोन लाख अंगणवाडी सेविका व कर्मचारी या शासकीय सेवेत नसून केवळ तुटपुंज्या मानधनावर काम करत असताना त्यांना ‘मेस्मा’ लावण्यासाठी शासनाने १५ मार्च २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत या अंगणवाडी सेविकांना (यापुढे कर्मचारी म्हणून संबोधण्यात येईल) अशी दुरुस्तीही करण्यात आली आहे. मेस्मा लागू केल्यास त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याखाली संपावर जाता येणार नाही.


[Source: Sakal, Loksatta | March 23, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी