Search This Blog

Thursday, 22 March 2018

सन फार्माच्या पहिल्या जैविक औषधाला यूएसएफडीएची मान्यता

सन फार्मा या भारतातल्या सर्वात मोठ्या औषध निर्मात्या कंपनीच्या एका औषधाला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) मान्यता मिळाली आहे. यूएसएफडीएने सनफार्माचे जैविक औषध 'ल्युमिया'ला मान्यता दिली आहे. मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या 'प्लेग सोरायसिस' या आजारावर उपचार करताना ल्युमिया या औषधाचा वापर केला जाणार आहे. हे औषध इंजेक्शनच्या स्वरूपात वापरले जाणार आहे.

औषधामागची पार्श्वभूमी
सन फार्माने सप्टेंबर 2014 मध्ये मर्क या अमेरिकी कंपनीकडून औषधाचा परवाना 505 कोटी रुपयांना विकत घेतला होता. त्यावेळेस या औषधाच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात (फेस थ्री ट्रायल्स) होत्या. या करारानंतर मर्कने सन फार्माच्या आर्थिक पाठबळावर संशोधन सूरूच ठेवले. यूएसएफडीएच्या मान्यतेनंतर आता कायदेशीर प्रक्रिया, मान्यतेनंतरचे संशोधन, औषध निर्मिती आणि विक्री या जबाबदाऱ्या सन फार्माच्या असणार आहेत. सन फार्मा आणि मर्क या दोन कंपन्यांमधल्या करारानुसार या औषधापासून मिळणाऱ्या उत्पन्नातला काही हिस्सा मर्क या कंपनीला देखील मिळणार आहे.

गेल्यावर्षी जैविक औषधांच्या संदर्भात दक्षिण कोरियाच्या सॅमसंग बायोलॉजिक्स या कंपनीबरोबर करार केला होता. या प्रमाणेच 2016 साली त्वचा रोगांवरच्या औषधांची निर्मिती करणाऱ्या स्पेनच्या 'अलमिरल' या कंपनीशी सन फार्माने करार केला होता. युरोपीय बाजारपेठेत अलमिरलच्या मदतीने व्यवसायवृद्दी करण्याचा सनफार्माचा प्रयत्न आहे.

औषध निर्मितीतली स्पर्धा
प्लेग सोरायसिस या रोगावरच्या औषधांची अमेरिकेतली बाजारपेठ 7 अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड आहे. त्यात सन फार्माच्या 'ल्युमिया' या औषधाची बाजारपेठ 2.5 ते 3 अब्ज डॉलर्सची आहे. नजीकच्या काळात ती वाढत जाणार असल्याचे बोलले जाते आहे. औषधांच्या या गटात तीव्र स्पर्धा आहे. यात सन फार्मासकट सहा कंपन्या आपल्या औषधांचा खप वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात अॅबवी अॅन्ड बोहरीन्जर या कंपनीचे औषध आतापर्यंत झालेल्या चाचण्यांनुसार सर्वात उत्तम असल्याचे समोर येते आहे.
विश्लेषकांच्या मते, ल्युमिया या औषधाच्या विक्रीतून सनफार्माला पूढील तीन ते चार वर्षांच्या कालावधीत अंदाजे 3.5 कोटी डॉलर्सचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या अग्रगण्य कंपनीने 'ट्रेम्फिया' हे याच प्रकारातील औषध बाजारात आणले होते. सुरक्षिततेच्या निकषांवर हे औषध इतर ब्रॅन्डच्या तुलनेत अधिक सक्षम असल्याचे देखील मानले जात आहे.

सन फार्माचे धोरण
ल्युमियाला मिळालेल्या मान्यतेच्या पार्श्वभूमीवर सन फार्माने आपल्या अमेरिकेतल्या व्यायसायिक हालचालींचा वेग वाढवला आहे. या स्पर्धेत औषधांच्या किंमतीबरोबरच, लहान डोसांच्या स्वरुपातील औषधांची उपलब्धता हे घटक महत्वाचे ठरणार आहेत. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या कंपनीच्या 'स्टेलेरा' या औषधाचा वर्षभरासाठीचा खर्च 42,000 डॉलर्स इतका आहे. मात्र वाढत्या स्पर्धेबरोबर या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
[Source: Sakal | March 23, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी