Search This Blog

Tuesday, 27 March 2018

CJI वर महाभियोग? काँग्रेसचा मसुदा तयार

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर त्यांच्याच चार सहकारी न्यायमूर्तींनी आक्षेप नोंदविल्याचा वाद थांबला असला तरी मिश्रा यांच्या मागचे ग्रहण काही सुटलेले दिसत नाही. सरन्यायाधीश मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनीही दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांसोबत चर्चा सुरू असल्याचं जानेवारीतच म्हटलं होतं. त्यावेळी काँग्रेसने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. पक्षात या मुद्द्यावर एकमत व्हावं म्हणून काँग्रेसेने वेळ काढूपणाचं धोरण अवलंबलं होतं. कारण कायद्याचे जाणकार असलेले नेते आणि इतर नेत्यांमध्ये याबाबत एकवाक्यता नव्हती. 

दरम्यान, 'मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाच्या मसुद्यावर अनेक राजकीय पक्षांनी सह्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्यांनीही सह्या केल्या असून तृणमूल काँग्रेसनेही त्यावर सही केली असावी,' असं सांगत राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांनी महाभियोग प्रस्तावाच्या बातमीला पृष्टी दिली आहे.

महाभियोग प्रस्ताव कसा आणतात?

कोणत्याही न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात मांडता येतो. लोकसभेत महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी कमीत कमी १०० सदस्यांनी प्रस्तावावर सह्या करायला हव्यात. तर राज्यसभेत हा प्रस्ताव मांडण्यासाठी केवळ ५० सदस्यांच्या सह्यांची गरज असते. मात्र कोणत्याही सभागृहात प्रस्ताव आल्यावर तो स्वीकारायचा की नाकारायचा याचा संपूर्ण अधिकार सभागृहाच्या सभापती किंवा अध्यक्षाला असतो.
[Source: Maharashtra Times | March 28, 2018]

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी