Search This Blog

Friday, 16 March 2018

सर्वोत्तम शहरांत पुणे ठरले अव्वलबेंगळुरूमधील 'जनग्रह सेंटर फॉर सिटिझनशिप अँड डेमोक्रसी' यांच्यातर्फे पाचव्या वार्षिक शहरांतर्गत व्यवस्थेच्या सर्वेक्षणात (एएसआयसीएस) पुण्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. देशातील २० राज्यांमधील २३ प्रमुख शहरांमधून प्रशासन व्यवस्थेच्या मूल्यांकनाद्वारे सर्वोत्तम शहरांची निवड करण्यात आली. त्यामध्ये, प्रथमच पुण्याने अव्वल स्थान मिळविले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वोत्तम शहराचा हा पुरस्कार बुधवारी नवी दिल्ली येथे स्वीकारला.

शहरी भागातील प्रशासनाची गुणवत्ता ठरवून त्याआधारे शहरांचे मूल्यांकन निश्चित करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून सर्वेक्षण 'जनग्रह'तर्फे केले जाते. २०१७ मध्ये ८९ प्रश्नांच्या आधारे २३ शहरांचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. त्यात, पुण्याने बाजी मारली. पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुण्यासह कोलकाता, तिरुअनंतपुरम, भुवनेश्वर आणि सुरत या शहरांचा समावेश आहे. तर, बेंगळुरू, चंडीगड, डेहराडून, पाटणा आणि चेन्नई या इतर पाच शहरांनी अव्वल दहामध्ये स्थान प्राप्त केले आहे. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या स्मार्ट सिटीच्या स्पर्धेतही पुण्याने दुसरा क्रमांक मिळविला होता.

0 comments:

Post a comment

आपले अभिप्राय आमच्या साठी नक्कीच महत्वाचे आहेत ....
टीम स्पर्धावाहिनी